divyamarathi rasik special article : Astronomy and Astrology | ​​​​​​​द्वंद्वः खगोलविज्ञान आणि फलज्योतिष

Share

[ad_1]

2 दिवसांपूर्वीलेखक: डॉ. नितीन शिंदे

  • कॉपी लिंक

अभ्यासक्रम ठरवताना संशोधन, विश्वासार्हता आणि सत्यतेला महत्व दिले जाते. ज्योतिष या पातळीवर अजिबात टिकत नाही. अवैज्ञानिक ज्ञान तरुणाईला देऊन आपण काय साध्य करणार आहोत. शैक्षणिक धोरणाच्या गाभा घटकात वैज्ञानिक दृष्टिकोनाचा समावेश केलेला आहे आणि इथे मात्र नेमका उलट व्यवहार. आर्थिक विवंचना आणि बेरोजगारीतून मार्ग काढण्यासाठी समाजाला पुन्हा एकदा त्याच खाईत लोटण्याच हे षडयंत्र आहे.

इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ, नवी दिल्ली (इग्नू) सन २०२१-२२ पासून एम.ए. ज्योतिष अभ्यासक्रम सुरू करत आहे. सदर अभ्यासक्रमामध्ये ग्रह ताऱ्यांचा मानवी जीवनावर होणारा परिणाम, पंचाग, मुहूर्त, कुंडली, ग्रहणवेध आदींचा समावेश असणार आहे. यापूर्वी २००१ मध्ये युजीसीच्या माध्यमातून ज्योतिष अभ्यासक्रम सुरू करण्याचा घेतलेला निर्णय ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर, प्रो. यशपाल आणि इतर अनेक वैज्ञानिकांनी विरोध केल्याने रद्द करावा लागला होता. यापूर्वीच अमेरिकेतील ‘द ह्युमॅनिस्ट’ मासिकाच्या सन १९७५ मधील अंकात डॉ. एस. चंद्रशेखर आणि इतर आठरा नोबेल पुरस्कारप्राप्त शास्त्रज्ञांसहित १८६ प्रतिष्ठित शास्त्रज्ञांनी स्वताच्या स्वाक्षऱ्यांनिशी फलज्योतिषविरोधी निवेदन प्रसिध्द केले होते. अती दूर असणारे तारे किंवा ग्रह मानवी जीवनावर प्रभाव टाकतात, हे असत्य असून फलज्योतिषाच्या भाकीतांना कोणताही शास्त्रीय आधार नाही, असे त्यांनी निवेदनात स्पष्टपणे नमुद केले होते.

महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती गेली तीस वर्षे खगोलविज्ञानाचा प्रसार करत आहे. एवढेच नाही तर फलज्योतिषाचा फोलपणा प्रबोधनाच्या माध्यमातून समाजासमोर मांडत आलेली आहे. एका बाजूला भारतीय अंतराळ संशोधन संस्था(इस्रो) तरूणाईला बरोबर घेत चंद्राला अथवा मंगळाला गवसणी घालण्याचा प्रयत्न करीत आहे. दुसऱ्या बाजुला इग्नूसारखे विद्यापीठ तरूणाईला ज्योतिषाची पदवी बहाल करत, समाजाला कडक मंगळ आणि शनिच्या साडेसातीत अडकवायला निघालेलं आहे. शिक्षणातून शहाणपण येतं असं म्हणतात, परंतु अशा प्रकारचं शिक्षण समाजाला अंधश्रध्देच्या खोल गर्तेत ढकलून देईल यात शंका नाही.

‘ज्योतिष’ आणि ‘फलज्योतिष’ या दोनही शब्दांचे अर्थ एकच असल्याचा सर्वसामान्यांचा समज आहे. रात्रीच्यावेळी आकाशात दिसणाऱ्या चादण्यांचा म्हणजेच ज्योतींचा वैज्ञानिक अभ्यास करण्यासाठी ‘ज्योतिष’ या शाखेची निर्मिती झाली. पिढ्यांपिढ्यांच्या निरीक्षणानंतर आकाशातील खगोलीय वस्तूंमधील गणितीय संगती शोधून काढण्यात मानवाला यश आले. असंख्य चांदण्यांच्या पार्श्वभूमीवर काही चांदण्या आपली जागा बदलतात असे निदर्शनास आले. सदर चांदण्यांना पाश्चात्यांनी ‘भटके’ अर्थात ‘प्लॅनेट’ तर भारतीयांनी ‘ग्रह’ म्हणून संबोधले. आकाशामध्ये आपले स्थान न बदलणाऱ्या चांदण्यांना तारे म्हणून ओळखलं गेलं. आकाशातील या ताऱ्यांचे राशींच्या रूपाने पाश्चात्यांनी बारा समूह, तर भारतीयांनी नक्षत्रांच्या रूपाने सत्तावीस तारकासमूह तयार केले. सूर्य, चंद्र, ग्रह, नक्षत्र आणि राशींचा परस्पर संबंध सांगणारे शास्त्र म्हणून ज्योतिष ओळखले जात होते. आजचे तथाकथित फलज्योतिष या व्याख्येमध्ये बिलकूल बसत नाही.

राजेशाहीच्या कालखंडामध्ये ज्योतिषांनी ग्रह ताऱ्यांचा प्रभाव मानवी जीवनावर पडतो, असे सांगण्यास सुरूवात केली. त्यामुळे ज्योतिषाची जागा फलज्योतिषाने घेतली. ज्योतिंषामुळे मिळणारे फल म्हणून फलज्योतिष. आजचे भविष्य सांगणारे भविष्यवेत्ते स्वत:ला ज्योतिषीच समजतात. प्रत्यक्षात ते फलज्योतिषी आहेत. शालेय अथवा महाविद्यालयीन अभ्यासक्रमातून मिळणारे ग्रहताऱ्यांचे ज्ञान ज्योतिषांना असलेल्या ज्ञानाच्या तुलनेत अत्यंत आधुनिक आहे. असे असले तरी सर्वसामान्यांना मात्र पंचांग आणि ज्योतिष या विषयात रस असतो. ज्योतिषांमध्ये असलेल्या अवैज्ञानिक बाबींचा उहापोह केल्याशिवाय त्यांचा फोलपणा लक्षात येणार नाही.

ज्योतिषांचा अभ्यास नवग्रह संकल्पनेशी निगडीत आहे. नवग्रह म्हणजे नऊ ग्रह… बुध, शुक्र, मंगळ, गुरू, शनी, सूर्य, चंद्र, राहू आणि केतू. यांच्या ग्रहांच्या संकल्पनेत पृथ्वी बसत नाही. चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह तर सूर्य हा तारा असूनही त्यांना ग्रह म्हणून मान्यता! राहू आणि केतू हे ग्रह नसून काल्पनिक बिंदू आहेत, पण यांच्यादृष्टिने ग्रह. व्यक्तीचं भरणपोषण करणाऱ्या पृथ्वीला ग्रहाचा दर्जा यांनी दिलेला नाही. युरेनस आणि नेपच्युनला ते ग्रहांच्या व्याख्येत घेत नाहीत. शाळेत असताना आठ ग्रह शिकणारा मुलगा ज्योतिषी झाल्यानंतर समाजाला नऊ ग्रह शिकवणार.

युरेनस, नेपच्यून हे ग्रह उघड्या डोळ्यांनी दिसत नाहीत. दुर्बिणीच्या शोधानंतर या दोन ग्रहांचा शोध अनुक्रमे सन १७८१ आणि सन १८४६ मध्ये लागला. त्यानंतर ज्योतिषांनी यांना पत्रिकेत स्थान दिले. पाश्चात्यांनी शोधलेल्या ग्रहांचा वापर करण्याची गरज नव्हती. खगोलशास्त्र परिषदेने प्लुटोचे ग्रहपद काढून घेतलेले असून त्याला ते बटु ग्रह म्हणतात. स्वत:चे आर्थिक हितसंबंध जपण्यासाठी ज्योतिषांनी अजूनही त्याला पत्रिकेमध्ये ठेवलेलं आहे. रास ही संकल्पना पाश्चात्य आहे, तर नक्षत्र ही संकल्पना भारतीयांची आहे. भारतीयांचे सर्व सण आणि उत्सव नक्षत्रांवर अवलंबून आहेत, हे त्याचे द्योतक आहे. पत्रिका तयार करताना बारा घरांची करण्याऐवजी सत्तावीस घरांची करायला हवी होती. रास किंवा नक्षत्र म्हणजे आकाशातील ताऱ्यांचे समूह. तारे म्हणजे दुसरे सूर्य. आकाशातील बारा स्टॉपच्या पार्श्वभूमीवर ग्रह फिरतात. सर्वात दूरचा बटु ग्रह प्लुटो आपल्यापासून सहाशे कोटी तर मंगळ बावीस कोटी किलोमीटर अंतरावर आहे. शेजारच्या घरात काय चाललेलं आहे ते आपल्याला समजत नाही आणि इथं ज्योतिषी बावीस कोटी किलोमीटर अंतरावरील मंगळाचा हवाला कसा घेत असतील? भारताचे मंगळयान मंगळाच्या कक्षेपर्यंत पोहोचायला तीनशे दिवस लागले, हे कडक मंगळवाल्यांनी लक्षात घ्यायला हवे.

तारे प्रचंड दूर आहेत. पंधरा कोटी किलोमीटर अंतरावरील सूर्यापासून प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचायला जवळपास आठ मिनिटे लागतात. याचा अर्थ आपण नेहमी आठ मिनिटांपूर्वीचा सूर्य पाहतो. आठ मिनीट जुना…ज्येष्ठा नावाच्या ताऱ्यापासून प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचायला नऊशे वर्षे लागतात तर ध्रुव ताऱ्याकडून प्रकाश आपल्यापर्यंत यायला तीनशे पंचाहत्तर वर्षे लागतात. थोडक्यात रात्रीच्या वेळी आकाशात दिसणारे तारे हजारो वर्षापूर्वीचे आहेत. त्यामुळे फार-फार वर्षापूर्वीचे तारे आपल्या आयुष्यात डोकावण्याची बिलकुल शक्यता नाही. दैनंदिन जीवनात रात्री बारा वाजून गेल्यांनतर नवीन दिवसाची सुरूवात होते. ज्योतिषांच्या दृष्टीने दिवसाची सुरूवात सूर्योदय झाल्यानंतर होते. भारतामध्ये पूर्वेकडे सूर्योदय लवकर होतो तर पश्चिमेला उशिरा. ज्योतिषांच्या दिवसाची सुरूवात मात्र वेगवेगळ्या वेळी होणार. ज्योतिषांच्या संशोधनानुसार सूर्यमालेचा केंद्रबिंदू सूर्य नसून पृथ्वी आहे. शालेय मुलं मात्र सूर्य केंद्रबिंदू आहे असं शिकतात. ज्योतिषी झाल्यानंतर हाच मुलगा पृथ्वी केंद्रबिंदू आहे असं सांगत फिरणार. सूर्य केंदबिंदू आहे असं सांगणाऱ्या गॅलिलिओला सतराव्या शतकात तुरूंगवासाची शिक्षा झालेली होती. एकविसाव्या शतकात भारतात कदाचित ही परिस्थिती निर्माण होऊ शकते. ज्योतिषांना महत्वपूर्ण ठरणारी जन्मवेळ ही सापेक्ष आहे. डॉक्टर-नर्सचे घड्याळ, दवाखान्यातील घड्याळ, टीव्ही-रेडीओचे घड्याळ, आई-वडीलांचे घड्याळ यापैकी कोणती वेळ ग्राह्य धरणार. बाळाचा जन्म तर नऊ महिन्यापूर्वीच झालेला असतो. शालेय अभ्यासक्रमामध्ये ग्रह ताऱ्यांचाआणि ग्रहणांचा मानवी जीवनावर परिणाम होत नाही, असे शिकवले जाते.ज्योतिषी ही पदवी घेतल्यानंतर परिणाम होतो, असं समाजमनावर बिंबवणार. शाळेत एक आणि विद्यापीठात दुसरचं.

फलज्योतिषाचा अभ्यास नसताना त्याला विरोध करणे योग्य नव्हे, असे काही जणांचे मत असते. त्यांच्यासाठी पत्रिका जुळवण्याचा प्रकार उलगडून दाखवतो. छत्तीस गुणांच्या या परीक्षेत अठरा गुण पडले की उत्तीर्ण. पन्नास टक्क्याला पासींग. सदर परीक्षा आठ विभागामध्ये विभागलेली आहे. त्यापैकी ‘वर्णगुण’ विभागानुसार मुलामुलींची चार वर्णात विभागणी केलेली आहे. विप्र, क्षत्रिय, वैश्य आणि शुद्र. या निराधार विभागणीचे शुद्राला वाईट वाटेल की नाही? विप्र म्हणजे ब्राम्हण,हे सुज्ञाला सांगायला नको. वरच्या वर्णातील मुलाने त्याच्या अथवा खालच्या वर्णातील मुलीशी लग्न केल्यास एक गुण. मुलीनं असं केलं तर मात्र शून्य गुण. शुद्र मुलाला मात्र त्यांनी पर्यायच ठेवलेला नाही. संस्कृतीच्या अधिकारामुळे वरिष्ठ जातीतील मुलाने कनिष्ठ जातीतील मुलीशी लग्न केले तर चालते. पण मुलीला मात्र परवानगी नाही. सर्वसामान्यांच्या मनात “सैराट’ने जे घर करून ठेवलेलं आहे, ते केवळ या एका गुणामुळे. लिखीत साहित्य कायमस्वरूपी समाजमन कसं बधीर करून टाकते, याचा हा उत्तम नमुना. पुरूषांमध्येही ब्राह्मण मुलाला उच्चस्थान! भावी ज्योतिषी संस्कृतिच्या नावाखाली वर्णव्यवस्था घट्ट करणार. हे संविधान आणि लोकशाही विरोधी आहे. अभ्यासक्रम ठरवताना संशोधन, विश्वासार्हता आणि सत्यतेला महत्व दिले जाते. ज्योतिष या पातळीवर अजिबात टिकत नाही. अवैज्ञानिक ज्ञान तरुणाईला देऊन आपण काय साध्य करणार आहोत. शैक्षणिक धोरणाच्या गाभा घटकात वैज्ञानिक दृष्टिकोनाचा समावेश केलेला आहे आणि इथे मात्र नेमका उलट व्यवहार. आर्थिक विवंचना आणि बेरोजगारीतून मार्ग काढण्यासाठी समाजाला पुन्हा एकदा त्याच खाईत लोटण्याच हे षडयंत्र आहे. संस्कृती आणि पंरपरेतून आलेल ज्ञान समाजाला उन्नत करणारं आणि पुढे घेऊन जाणारं असेल, तर ते देण्याला कोणाचीच हरकत नाही. अंधश्रध्देचा प्रसार करणारे ज्ञान समाजाला अविवेकी बनवेल यात तिळमात्र शंका नाही. म्हणून माणसाला गुलामीत ढकलणारा आणि शोषणावर आधारलेला हा अभ्यासक्रम समाजाने नाकारला पाहिजे.

(लेखक खगोल अभ्यासक आणि महाराष्ट अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते आहेत.)

nsshinde66@gmail.com

बातम्या आणखी आहेत…

[ad_2]

Source link

Leave a Reply