[ad_1]
9 दिवसांपूर्वीलेखक: रणधीर शिंदे
- कॉपी लिंक

मराठीत गुणसंपन्न आणि मौलिक कथा लिहिणाऱ्या जयंत पवार यांच्या ‘फिनिक्सच्या राखेतून उठला मोर’ व ‘वरनभातलोन्चा नि कोन नाय कोंचा’ या कथासंग्रहानंतरचा ‘लेखकाचा मृत्यू आणि इतर गोष्टी’ हा तिसरा कथासंग्रह. वर्तमानाचे बहुमुखी दर्शन घडविणारा लेखक म्हणून जयंत पवार यांच्या कथासृष्टीला विशेष महत्त्व आहे. ढासळत्या शतकाची ‘घरघर’ आणि नव्या शतकातील तणावांचे बहुल दर्शन त्यांच्या कथेने घडविले. महानगरीय जीवनाचे गुंतागुंत, असंख्य व्यक्तींची स्वभावदर्शने, परागंदा आणि अस्तंगत वाटेवरील सामान्यांच्या अस्वस्थ जगाचे चित्र त्यांच्या कथेत आहे.
जळून खाक झालेल्या निषादांबद्दल व्यासांनी काहीच माहिती पुरवली नसल्यामुळे नंतरच्या लेखकांना त्यांच्याबद्दल काहीच नोंद करता आली नाही. निषादांच्या हत्येच्या आरोपाची निश्चिती कोणीही केली नाही. जर कोणी केली असेल तर कौरवांच्या नंतर सत्तेत आलेल्या पांडवांच्या काळात तो अहवाल दडपला गेला असण्याची शक्यता आहे. त्या नंतरच्या प्रत्येक काळात पांडवप्रेमीच सत्तेत असत आले. त्यामुळे सर्व अहवालांत निषादांबद्दल मौन बाळगलं गेलं.
ही पद्धत अजून चालू आहे. (लाक्षागृह) जयंत पवार यांच्या नव्या कथासंग्रहातील ‘लाक्षागृह’ कथेतील वरील अवतरण आहे. पवार यांचा कथास्वर लक्षात आणून देणारी दणकट कथासृष्टी त्यांच्या नव्या संग्रहातील कथेत आहे. मराठीत गुणसंपन्न आणि मौलिक कथा लिहिणाऱ्या जयंत पवार यांच्या ‘फिनिक्सच्या राखेतून उठला मोर’ व ‘वरनभातलोन्चा नि कोन नाय कोंचा’ या कथासंग्रहानंतरचा ‘लेखकाचा मृत्यू आणि इतर गोष्टी’ हा तिसरा कथासंग्रह. कथा साहित्यप्रकाराच्या शक्यता वृद्धिंगत करणारी प्रयोगशील कथा त्यांनी सतत लिहिली. वर्तमानाचे बहुमुखी दर्शन घडविणारा लेखक म्हणून जयंत पवार यांच्या कथासृष्टीला विशेष महत्त्व आहे. ढासळत्या शतकाची ‘घरघर’ आणि नव्या शतकातील तणावांचे बहुल दर्शन त्यांच्या कथेने घडविले. महानगरीय जीवनाचे गुंतागुंत, असंख्य व्यक्तींची स्वभावदर्शने, परागंदा आणि अस्तंगत वाटेवरील सामान्यांच्या अस्वस्थ जगाचे चित्र त्यांच्या कथेत आहे. मानवी जगण्यावरील खोलवरची आस्थादृष्टी आणि व्यापक करुणाभाव जयंत पवारांच्या कथेत आहे. हिंसा आणि विविध प्रकारची कौर्यरूपे आणि आधुनिकोत्तर जाणिवांचे जग त्यांच्या कथेत आहे. सुघड सुनियोजित रूपबंधाची कथा त्यांनी लिहिली. भारतीय इतिहासातील संघर्षाच्या टकरावांंची निश्चित अशी दृष्टी त्यांच्या कथेत आहे. समाजेतिहासात धुसर झालेल्या शक्यतांना आणि कथनरीतीला ते नेहमी अधोरेखित करतात. बदलाच्या ‘घडणींच्या मागे असणाऱ्या ‘व्यवस्था’ रचनेला नेहमी जयंत पवार यांच्या कथेने साक्षात केलेे. कथनाचे असंख्य प्रयोग आणि कालगतीचे वेधक चित्रण जयंत पवारांच्या कथेत आहे. या संग्रहातील कथा ही ऱ्हस्व स्वरूपाची आहे. मात्र त्याचा चित्रफलक विशाल आणि विस्तृत आहे. ती नव्या रूपात व्यक्त झाली आहे. दशकाचे अस्वस्थ महाकथन पवारांच्या कथेत आहे. छोट्या छोट्या कथाबिंदूतून ती आजच्या गुंतागुंतीच्या वास्तवाचे बहुस्वरीय कथन त्यांच्या कथेत आहे. प्राचीन संहिता आणि ‘गोष्टीं’चे ध्वनी-प्रतिध्वनी ‘आजच्या’ जगण्यातून शोधले आहेत. आजचे जग त्या ‘गोष्टीं’ना रिलेटेड करून कथाशयाच्या कक्षांचा विस्तार झाला आहे.
जयंत पवार यांच्या या कथासृष्टीची पार्श्वभूमी गेल्या दशकातील राज्य-राष्ट्र घडणीची आहे. या दशकात ज्या वेगाने घडामोडी नवे जग आकारत आहे. त्याची गती विलक्षण स्तिमित करणारी आहे. भौतिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक बदलाचा मानवी जीवनावर थेट परिणाम झाला. राजकारण, सत्ता आणि आर्थिक प्रश्नांनी मानवी जीवनच संशयातीत झाले. भोंगळ राष्ट्रवादाचे पराकोटीचे आकर्षण. परंपराप्रेम, अस्मितांचे टकराव आणि एकल हुकुमशाही नेतृत्वाचा हा काळ आहे. जयंत पवार यांनी या काळाचे कथावाचन हे विविध प्रतीके, रूपके आणि मिथकांतून केले आहे. त्यांच्या कथानिर्मितीतील मिथकावलीत आजचे गुंतागुंतीचे गडद असे वास्तव दडलेले आहे. म्हणून त्यांची कथा ही सरधोपट वास्तववादी परंपरारेतील कथा नाही.
महानगराची मिती हा त्यांच्या लेखक म्हणून संवेदनेचा महत्त्वाचा संदर्भबिंदू आहे. वाढती गुन्हेगारी, हिंस्त्रता आणि नवभांडवली रचनेतील ताण त्यांनी रेखाटले. महानगरांतील अस्तंगत इतिहास आणि संक्रमण बिंदूवरील माणसांची अस्वस्थ मनोगते या कथेत आहेत. कामगारांच्या अस्तित्वाच्या निकराच्या लढाईपासून त्यांच्या पडझड पराभवाची रूपे आहे. तसेच ‘नव्या असंतोषाच्या जनकाचे,’ ‘दयावान’ माणसात झालेल्या रुपांतराची विरोधचित्रे आहेत. हा पालट मानवहितविरोधी आहे. याचे सूचन त्यांच्या कथेत आहे. धार्मिक दंग्यात पाय गमावलेल्या रोशन आणि तिचे चाचा यांच्या ‘व्यवस्था नाडवणुकी’च्या शोकांत व्यथाकथांचे चित्र ‘अजान’ कथेत आहे. समूह हिंसेत ‘बळी’ जाणाच्या सामान्य माणसांच्या जगण्याचे तसेच या शहराच्या अपरिहार्यंतेच चित्र जयंत पवार यांनी रेखाटलेले चित्र अस्वस्थ करणारे आहे. एकाअर्थाने महानगरांच्या चमचमत्या लखलखाटातील काळोख्या अभाव जगाचे आणि लोप पावत चाललेल्या समाजाचे इतिहासकथन त्यात आहे.
उन्मादी राष्ट्रवादाने सध्याचा काळ गजबलेला आहे. गोंडस राष्ट्रवादाच्या वारुसमोर लगतचा समूह इतिहास देखील विस्मृतीत ढकलला जात आहे. रूपकात्म प्राणिकथेच्या माध्यमातून राज्यकर्त्यांच्या या हास्यास्पदतेचेे विडंबन ‘हॅरीचं हसू’ कथेत आहे. तर ‘शाळा’ सारख्या कथेत अल्पजणांच्या हुकुमशाही राष्ट्रवादाचे चित्रण आहे. असमानता व बहुल वैविध्यता छाटून टाकणाऱ्या इतिहासप्रेमी, पावित्र्यवादी परंपरावादी एकल राष्ट्रवादाचे चित्रण कथेत आहे. महामारी विषयावर मराठीत गेल्या वर्षभरात उदंड लिखाण झाले. या पार्श्वभूमीवर या संग्रहातील ‘आणि शेवटी’ या कथेत महामारी काळातील राजकीय व्यवस्थेचे सखोल दर्शन आहे. ती केवळ घटना-घडामोडी पुरती सीमित राहत नाही तर तिला व्यवस्थापाहणीचे स्वरूप प्राप्त होते. महामारी काळात समाज देहामनाने मरत चालला असताना राष्ट्रप्रमुख व्टिटरवरून शांती प्रगतीचा संदेश देत राहतात. ‘साधूसंतमंहंतधर्मधुरंधरांशी’ त्यांचा संपर्क चालू असतो. ‘होमहवनपूजापठणमंत्र जागरणादि क्रियाकर्म’ ते चालू ठेवतात. तसेच ते सप्तचिरंजीवी अर्काच्या’ शोधात आहे. या कथासादरीकरणात प्रत्यक्षातल्या जगण्याचे आणि अंतर्विरोधाचे चित्रण आहे. एका अर्थाने जयंत पवार राजकीय जाणिवांचेच प्रभावीरित्या प्रकटीकरण करतात. आधुनिक काळातील हिंसा क्रौय आणि शोषण हा त्यांच्या कथेचा एक चित्रणविषय आहे. बाईच्या अदृश्यपणाला जबाबदार असणाऱ्या जीवनाचे चित्रण त्यांच्या कथेत आहे. ‘चौकशी’ सारख्या कथेत प्रदीर्घ काळापासूनच्या स्त्रीशोषणाच्या मौनास मुखर केले आहे. तर पाळणाघरातील मुलं टाइमपास म्हणून फॅमिली पार्टी, डिव्होर्स तसेच सामुदायिक रेपचा खेळ रचतात. या फॅण्टसीच्या माध्यमातून अस्वस्थ भीतीदायक जगाचे कथन केले आहे. आधुनिकोत्तर काळातील जाणिवांचे पदर त्यांच्या कथनसूत्रांना आहे. मानव आणि पशू यांच्यातील स्थानांतरणाची भयचित्रे त्यांच्या कथांत आहे. आधुनिकता आणि विकासाच्या तकलादू कल्पना आणि मूळ पशूत्व यातल्या सरमिसळणीचे कथनसूत्र ‘राखणदार’ या कथेत आहे.
मरणभानाचे विविध पातळ्यावरील चित्रण हा त्यांचा या संग्रहातील एक वेगळे वैशिष्ट्य आहे. विविध प्रकारच्या मरणभानाची व्याप्ती अनेक कथांमध्ये आहे. दहशतवाद, धार्मिक उन्माद तसेच कौटुंबिक हिंसेच्या मरणांपासून पासून अकस्मिक आजार मरणाची चित्रे त्यांच्या कथांत आहेत. बदलत्या सामाजिक अवकाशातील लेखकांची मरणरूपे आहेत. लेखकांचा समाजहस्तक्षेप वा विवेकी स्वरूपाचा असतो. या पार्श्वभूमीवर ‘लेखकांची मरणे’ ही प्रतीकात्म स्वरूपाची आहेत. एका अर्थाने आजच्या व्यवस्थेला ‘लेखक नको आहे’ याच जाणिवेचे सूचन त्यात आहे. लेखकांशिवाय जागृत जगाशिवायच्या माणसांचे जगणे आजच्या व्यवस्थेला अभिप्रेत असणाऱ्या समाजाचे स्वरूप इथे आहे. प्लेटोच्या विधानाची हटकून इथे आठवण येणे स्वाभाविक आहे.
पुराकथा वा मिथकांचे पुनर्वाचन आणि त्यांची पुननिर्मिती हे जयंत पवार यांच्या या कथांचे वैशिष्ट्य आहे. या कथा आकाराने लहान आहेत. विडंबन, उपहास प्रतीकात्मता हे तिचे वैशिष्ट्य आहे. लहान आकारबंधांत त्यांनी जीवनानुभवाचा दृष्टीचा मोठा चित्रफलक प्राप्त करून दिला आहे. त्यामुळे त्यांनी या कथांना कथा म्हणण्याऐवजी ‘गोष्ट’ म्हटले आहे. ‘गोष्टी संपायला इथून सुरुवात झाली. खरं तर गोष्टी संपत नसतात. त्या सांगायला निमित्त लागते. आणि ऐकणाऱ्याला रस लागतो. ते दोन्ही संपले की शब्द थिजतात, आणि शब्द जागा आशय भरायला लागतात.’ (पोकळी) यांचा या कथनदृष्टीवर प्रभाव आहे.धर्मकहाण्या, महाभारत कथा तसेच मौखिक कथांचा विलोभनीय वापर जयंत पवार यांनी केला आहे. आधुनिक मराठी साहित्यात या प्रकाराच्या कथानिर्मितीसाठी परंपरागत कथनाच्या पुनर्बांधणीचे या सारखे प्रयत्न अपवादभूतच म्हणावे लागतील. तेही आधुनिक वर्तमानाची गोष्ट सांगण्यासाठी. ‘बैल’सारख्या केवळ 52 ओळींच्या कथेत त्यांनी शिवलीलामृत मधील निरुपण कथनाचा सर्जनशील वापर वेधक असा आहे. हरि तात्याच्या जावई आणि मुलाच्या मृत्यू दरम्यानचे परपंराशील श्रद्धामन आणि वर्तमानातील ताणाचे कथन त्यात आहे. तर ‘लाक्षागृह’ मधील कथेत पांडव आणि निषाद यांच्यातील सत्ताधाऱ्यांच्या कपटाची कथा आहे. राष्ट्रउभारणीतील आतिथ्यशील फसवणूक पार्श्वभूमीवर वाडा पेटवून भुयारातून पसार होणाऱ्या पांडवाच्या चरित्राचे केलेले कथन लोकविलक्षण आहे. वर्तमानाचे त्यास संदर्भ जोडले गेल्यामुळे या कथाशयाच्या भावकक्षा मूलभूत सनातन जाणिवेशी नाते सांगतात. निषादांच्या जळितकांडाचा ‘चौकशी’ अद्याप झालेली नाही. कारण सत्तेत त्यांचेच वारसच पुन्हा-पुन्हा आहेत. ‘ही पद्धत अजून चालू आहे.’ या कथाशेवटाने कथेचा पैस अधिक रुदांवतो. ती कथा सर्व काळाची कथा होते. मृत्यू आणि सर्जन यांच्या सहसंबंधी पातळीवरच्या या कथा आहेत. भारतीय कथनपरंपरेतील ‘गोष्टी’ला पुनसर्जनाच्या रूपातील ही प्रतिकथासृष्टी आहे. राष्ट्रघडणीची वाटचाल पडझडीचे भीषण स्वरूप या कथनसृष्टीत आहे. मराठी कथापंरपरेला संपन्नता आणि समृद्धता प्राप्त करून देणाऱ्या या अस्वस्थवर्तमान कथा आहेत. म्हणून भारतीय समाजाला, वाचकांना नेहमीच अपु्रप वाटावे अशा ‘गोष्टीं’ ते लिहीत आहेत. लेखकाचा मृत्यू आणि इतर गोष्टी जयंत पवार शब्द पब्लिकेशन्स, मुंबई. पृ. 155 मूल्य-250 randhirshinde76@gmail.com
[ad_2]
Source link